“आम्ही लागवड केली, तर तुम्ही माल घ्याल ना?”
दिलीप परबसंस्थापकाची अनुभव नोंद. प्रत्यक्ष कामातून पडलेले प्रश्न आणि त्यासोबत वाचलेले संशोधन. हा नवीन बॅच मोजमापांचा किंवा नियंत्रित चाचणीचा अहवाल नाही. Read the English companion.
लेमनग्रासपासून खस आणि चाफ्यापर्यंत — कोकणात सुगंध उद्योगाची साखळी जोडण्याचा पुढचा टप्पा.
या लेखात
आमच्याकडे शेती आणि कारखाना पाहायला येणारे अनेक जण एक प्रश्न विचारतात.
“आम्हीही लेमनग्रास लावलं, तर तुम्ही आमचं गवत विकत घ्याल ना?”
प्रश्न अगदी रास्त आहे. शेतकऱ्याने पीक लावायचं म्हटलं, की त्याला आधी विक्रीची खात्री हवी.
पण या प्रश्नाला नुसतं “हो” म्हणणं आणि ती व्यवस्था प्रत्यक्ष चालवणं यात मोठं अंतर आहे. आणि हे अंतर फक्त व्यवहारातलं नाही; काही वेळा ते शेतापासून कारखान्यापर्यंतच्या रस्त्यावरचंही असतं!
गेली पाच वर्षं आम्ही लेमनग्रासवर सातत्याने काम करतोय. लागवड केली, तेल काढलं, त्यापासून उत्पादनं तयार केली आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवली. शेती, आसवन, उत्पादननिर्मिती आणि विक्री यांची एक कार्यरत साखळी उभी केली.
या प्रवासाने आत्मविश्वास दिला. पण त्याचबरोबर काही मर्यादाही दाखवल्या.
आमच्या शेतात आणि कारखान्यात चाललेलं गणित प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याला तसंच लागू होईल का?
आता आमच्या संशोधनाची दिशा याच प्रश्नातून पुढे जाते आहे.
गवताच्या सुगंधाबरोबर त्याच्या वाहतुकीचाही विचार करावा लागतो!
लेमनग्रासमध्ये एक महत्त्वाची अडचण आहे. कापलेलं गवत वाहतुकीत भरपूर जागा व्यापतं. तेल तयार झाल्यावर ते छोट्या डब्यात मावतं; पण त्या तेलासाठी लागणारं गवत कारखान्यापर्यंत आणताना गाडी, माणसं, वेळ आणि पैसा लागतो.
आमच्या कामात कापणी, गवत गोळा करणं, यंत्रात भरणं आणि आसवन करणं या प्रत्येक टप्प्याचा हिशेब समोर येतो. आता इतर शेतकऱ्यांना या साखळीत जोडायचं म्हटलं, की त्यांच्या शेतापासून वाहतुकीचा खर्चही त्यात जोडला जातो.
म्हणजे कारखाना माल घ्यायला तयार आहे, एवढ्यावर प्रश्न सुटत नाही. तो माल कारखान्यापर्यंत पोहोचवल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात किती उरतं, हा खरा प्रश्न आहे.
इथे सगळ्यांसाठी एकच किलोमीटरची मर्यादा सांगता येत नाही. गाडी किती भरते, रस्ता कसा आहे, किती फेऱ्या होतात, त्या गवतापासून किती तेल मिळतं आणि कोणत्या दराने व्यवहार होतो—यावर उत्तर बदलतं.
याचा अर्थ दूरच्या शेतकऱ्यांसाठी लेमनग्रासचा पर्याय कायमचा बंद, असाही नाही. काही ठिकाणी जवळच सामूहिक प्रक्रिया केंद्र किंवा फिरतं आसवन यंत्र उपयोगी ठरू शकतं. CSIR-CIMAP ने शेतापर्यंत नेता येणारी मोबाइल डिस्टिलेशन युनिट विकसित केली आहे; कच्चा माल दूर नेण्याचा वेळ आणि खर्च कमी करणं हा तिच्या उद्देशांपैकी एक आहे. मात्र आपल्या भागात अशी व्यवस्था कितपत परवडेल, तो स्वतंत्र अभ्यास आहे. India Science and Technology
मला आता एक गोष्ट स्पष्ट वाटते—कोकणात उद्योगव्यवस्था उभारायची म्हणजे प्रत्येक गावातला सगळा कच्चा माल माझ्याच कारखान्यात आला पाहिजे, असं नाही. योग्य ठिकाणी योग्य प्रक्रिया उभी राहिली पाहिजे.

म्हणून आता खस आणि चाफ्याकडे पाहतोय
लेमनग्रास सोडून नवीन पीक शोधतोय, असं नाही. लेमनग्रासने शिकवलेल्या गोष्टी पुढच्या पिकांना लागू करून पाहतोय.
सध्या खस अर्थात Vetiver आणि चाफा यांच्यावर अभ्यास पुढे नेतोय. पण त्यांची निवड फक्त “तेलाला जास्त भाव मिळतो” म्हणून करायची नाही.
आपल्याला पीक निवडताना त्याचा बाजारभाव दिसतो. मला आता त्या भावामागचं संपूर्ण काम पाहायचं आहे.
रोपं कुठून मिळतील? आपल्या मातीत वाढ कशी होईल? काढणी किती वेळाने करावी लागेल? तोपर्यंत शेतकऱ्याचा पैसा किती काळ अडकून राहील? कच्चा माल किती काळ ठेवता येईल? त्याचं आसवन आपल्या यंत्रात होईल की वेगळी प्रक्रिया लागेल? आणि शेवटी तयार झालेला अर्क कोणत्या गुणवत्तेचा हवा, हे खरेदीदार काय सांगतो?
महाग तेलाची बाटली दाखवणं सोपं आहे. त्या बाटलीपर्यंत पोहोचण्याचा खर्च मोजणं हे खरं काम आहे.
खसाच्या बाबतीत प्रश्न जमिनीखालून सुरू होतो
खसाचं सुगंधी तेल त्याच्या मुळांपासून मिळतं. आंतरराष्ट्रीय सुगंधी घटक उत्पादक IFF च्या नोंदीतही खसाच्या मुळांपासून आसवनाने तयार केलेलं तेल परफ्यूम आणि इतर सुगंधी उपयोगांसाठी दिलेलं आहे. म्हणजे त्याचा उद्योगातील उपयोग हा केवळ कल्पना नाही. IFF
पण माझ्यासाठी प्रश्न फक्त खस वाढेल का, एवढाच नाही.
आपल्या जमिनीत त्याची मुळं कशी विकसित होतील? ती बाहेर काढताना किती श्रम लागतील? माती काढणं, धुणं, वाहतूक आणि आसवन यांचा मिळून खर्च किती येईल? लेमनग्रासपेक्षा वेगळी कच्च्या मालाची साखळी तयार करता येईल का?
या संदर्भात CSIR-CIMAP च्या संशोधकांचा एक अभ्यास वाचण्यासारखा आहे. तामिळनाडूतील किनारी भागात २०१७–२०१९ दरम्यान केलेल्या अभ्यासात खसाची काढणी वेगवेगळ्या महिन्यांत केल्यावर तेल मिळण्याच्या प्रमाणात ०.६५ ते १.४५ टक्के अशी तफावत नोंदली गेली. वातावरण आणि काढणीचा काळ उत्पादनाशी जोडलेले असल्याचं त्या अभ्यासातून दिसतं. हे कोकणासाठी हमीचे आकडे नाहीत; इथे स्वतंत्र चाचण्या का आवश्यक आहेत, याचं उदाहरण आहे. CIMAP
मुळांची साठवण हाही वेगळा विषय आहे. CSIR-CIMAP, बेंगळुरू येथील CIM-Vridhi जातीवरील प्रयोगात दीर्घ साठवणीनंतर तेल मिळण्याचं प्रमाण घटलं. त्या प्रयोगाच्या परिस्थितीत संशोधकांनी काढणीनंतर ३० दिवसांच्या आत आसवन करण्याची शिफारस केली. त्याच अभ्यासातील प्रयोगशाळेच्या पद्धतीत आसवनासाठी २४–३० तास वापरले होते. हे सर्व यंत्रांना लागू होणारे निश्चित वेळापत्रक नाही; पण “मुळं आणली आणि आपल्या सोयीने कधीही तेल काढलं” इतकं सरळ गणित नसल्याचं यातून समजतं. Update Publishing
म्हणून खसाचा अभ्यास करताना लागवडीबरोबर काढणी, साठवण आणि प्रक्रियेचं नियोजनही करावं लागणार आहे.
चाफ्यात आव्हान वेगळं—फुलाचा सुगंध बाटलीत तसाच मिळेल का?
चाफ्याच्या बाबतीत सुरुवातच अचूक वनस्पती ओळखीपासून करावी लागते. पांढऱ्या चाफ्यासाठी जुन्या संशोधनात आढळणारं Michelia alba हे नाव, Kew च्या सध्याच्या नोंदीत Magnolia × alba या नावाखाली येतं. त्यामुळे फक्त “चाफा” एवढं नाव पुरेसं न मानता नेमक्या कोणत्या वनस्पतीवर काम करतोय, हे निश्चित करणं आवश्यक आहे. Plants of the World Online
त्यानंतरचा प्रश्न आणखी रंजक आहे.
झाडावरच्या फुलाला सुंदर सुगंध आहे, म्हणजे त्याचं आसवन केल्यावर तोच सुगंध मिळेल का?
२००७ मध्ये प्रकाशित झालेल्या पांढऱ्या चाफ्यावरील एका अभ्यासात वाफेने आसवन, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन आणि चरबीत सुगंध शोषून घेण्याची enfleurage पद्धत यांची तुलना केली होती. त्या प्रयोगात वाफेने मिळालेल्या तेलाचा गंध ताज्या फुलांपेक्षा उकडलेल्या फुलांसारखा वाटल्याची नोंद संशोधकांनी केली. वेगवेगळ्या पद्धतींनी मिळालेल्या अर्कांची रासायनिक रचनाही वेगळी होती. Thai-Journal Online
हे वाचल्यावर आपल्या कामासमोरचा प्रश्न अधिक स्पष्ट होतो.
लेमनग्राससाठी प्रक्रिया जमली म्हणून तीच पद्धत प्रत्येक सुगंधी फुलासाठी तितकीच योग्य ठरेल, असं गृहीत धरता येणार नाही. चाफ्यासाठी फुलांची उपलब्धता, तोडणीपासून प्रक्रियेपर्यंतचा वेळ, सुगंधाची गुणवत्ता आणि निष्कर्षणाचा खर्च यांची सांगड घालावी लागेल.
चाफ्याचा सुगंध वापरून परफ्यूम तयार करणं आणि स्थानिक फुलांपासून सातत्यपूर्ण दर्जाचा सुगंधी अर्क तयार करणं या दोन वेगळ्या पायऱ्या आहेत. पुढच्या अभ्यासात मला ही दुसरी पायरी समजून घ्यायची आहे.
दुसऱ्या राज्यातलं यश कोकणात जसंच्या तसं आणता येईल का?
या संशोधनासाठी नुकताच इतर राज्यांतील काही शेतकऱ्यांना भेटून आलो. त्या भेटींमधली निरीक्षणं आणि निष्कर्ष पुढील लेखांत सविस्तर मांडणार आहे.
पण अशा अभ्यासाकडे पाहताना एक गोष्ट मनात ठेवतोय. तिथे एखादं पीक चांगलं येतं, म्हणजे इथेही तसंच येईल, हा निष्कर्ष आधीच काढायचा नाही.
आपल्याकडचा पाऊस, उन्हाळ्यात उपलब्ध होणारं पाणी, मातीची खोली, निचरा, शेतापर्यंतचा रस्ता आणि कामासाठी उपलब्ध माणसं—हे सगळं त्या पिकाच्या हिशेबात बसलं पाहिजे.
माझ्या मते पीक निवडताना तीन प्रश्न वेगवेगळे विचारावे लागतील.
ते इथे वाढेल का? त्यापासून अपेक्षित दर्जाचा कच्चा माल मिळेल का? आणि तो तयार करून विकणं परवडेल का?
पहिल्या प्रश्नाला “हो” मिळालं म्हणजे उरलेल्या दोघांची उत्तरं आपोआप मिळत नाहीत.
त्यात काढणीचा काळही महत्त्वाचा आहे. काही पिकांतून तुलनेने नियमित उत्पन्न मिळू शकतं; काहींसाठी जास्त काळ थांबावं लागेल. मला अशी पीक आणि प्रक्रिया व्यवस्था शोधायची आहे, जिच्यात शेतकऱ्याचा पैसा, कारखान्याची क्षमता आणि बाजाराची गरज यांचा मेळ बसेल.
सगळ्यांनी एकाच वेळी एकच पीक लावावं आणि नंतर सगळ्यांनी एकाच खरेदीदाराकडे बघत बसावं, अशी व्यवस्था उभी करायची नाही.
मला नवीन पिकांची यादी नाही, चालणारी व्यवस्था उभी करायची आहे
कोकणात औषधी आणि सुगंधी वनस्पतींची उद्योगव्यवस्था निर्माण करण्याचा विचार मोठा आहे. पण सध्या आमच्या प्रत्यक्ष अनुभवाचा पाया लेमनग्रास आणि सुगंधी उत्पादनांचा आहे. त्या पायावर पुढची पावलं तपासून टाकायची आहेत.
मला अशी व्यवस्था पाहायची आहे, ज्यात कुणी विश्वासार्ह रोपं तयार करेल, कुणी योग्य पद्धतीने लागवड करेल, कुणी संकलन आणि प्रक्रिया सांभाळेल. प्रयोगशाळेतील तज्ज्ञ गुणवत्ता तपासतील; उत्पादन विकसित करणारी आणि बाजारपेठेशी जोडणारी माणसंही तयार होतील.
यातलं सगळं आम्हीच करायचं, असं नाही. आपल्याकडे नसलेली कौशल्यं योग्य माणसांशी आणि संस्थांशी जोडून मिळवता आली, तरी ती उद्योगव्यवस्थेचीच ताकद आहे.
आणि जैवविविधतेतून समृद्धी निर्माण करायची म्हणजे निसर्गात जे दिसेल ते मोठ्या प्रमाणावर गोळा करायचं, असाही माझा अर्थ नाही. वनस्पतींची ओळख, संवर्धन, योग्य लागवड आणि शाश्वत उपयोग हा या विचाराचा पाया असायला हवा.
आता The Konkan Fragrance Project मधून हा अभ्यास मोकळेपणाने समोर ठेवणार आहे. काय शक्य दिसतंय, कुठे अडचण आहे, कोणता प्रयोग करायचा आहे आणि कोणता पर्याय परवडत नाही—हेही सांगणार आहे.
प्रत्येक वनस्पतीत उद्योग सापडेलच असं नाही. काही कल्पना बदलाव्या लागतील. काही थांबवाव्याही लागतील. पण शेतकऱ्याला लागवड करायला सांगण्यापूर्वी आपल्याला हे प्रश्न पडलेले बरे.
कारण “आम्ही लागवड केली, तर तुम्ही माल घ्याल ना?” या प्रश्नामागे फक्त कच्चा माल नसतो.
त्यामागे कुणाची जमीन, कुणाचे श्रम, कुणाची बचत आणि आपल्या शब्दावर ठेवलेला विश्वास असतो.
त्या विश्वासाला केवळ उत्साहाचं उत्तर देऊन चालणार नाही. त्यामागे प्रत्यक्ष चाचण्या, व्यवस्थित हिशेब आणि चालणारी बाजारपेठ उभी करावी लागेल.
कोकणाचा सुगंध जगापर्यंत न्यायचा आहे; पण त्यातून निर्माण होणारं ज्ञान, कौशल्य आणि समृद्धी कोकणातही रुजली पाहिजे.
— दिलीप परब
The Konkan Fragrance Project | The Konkan Farmer
लेखातील प्रमुख संशोधन संदर्भ
Yogendra आणि सहकारी, २०२१ — Validation of harvesting time in vetiver crop for enhancing root and oil yield in Tsunami affected coastal regions of Tamil Nadu.
खसाची काढणी, स्थानिक हवामान आणि तेलप्राप्ती यांतील संबंध; Journal of Medicinal and Aromatic Plant Sciences, 43(3–4), 148–153. CIMAP
R. Ravi Kumara, T. Arul Prakash आणि N. D. Yogendra — Discrepancy in essential oil yield & root structure of vetiver across different storage periods.
CIM-Vridhi जातीच्या मुळांची साठवण आणि तेलप्राप्तीवरील प्रयोग; Journal of Spices and Aromatic Crops, 33(2), 242–248, २०२४ अंक. Update Publishing
Pensuk आणि सहकारी, २००७ — Comparison of the Chemical Constituents in Michelia alba Flower Oil Extracted by Steam Distillation, Hexane Extraction and Enfleurage Method.
पांढऱ्या चाफ्याच्या निष्कर्षणपद्धतींमुळे सुगंध आणि रासायनिक रचनेत आढळलेले फरक; Journal of Thai Traditional and Alternative Medicine, 5(1). Thai-Journal Online


